ओमायक्रॉनवर बूस्टर डोस घ्यावा लागणार?; अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती
जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीव रगरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. कोविशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास, ओमायक्रॉनचे संकट लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे, असे मत भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला व्यक्त केले आहे.
"आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित केले आहेत. जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. सध्या प्राधान्याने करोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे अदर पूनावाला म्हणाले.
दरम्यान, भविष्यात बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे. केंद्राच्या करोना समितीचे प्रमुख एनके अरोरा म्हणाले होते की, भारत आणि युरोप-उत्तर अमेरिकन देशांमध्ये परिस्थिती सारखी नाही. आपल्या लोकसंख्येच्या मोठ्या संख्येने करोना संसर्ग झाला आहे आणि लस अतिरिक्त संरक्षण प्रदान करत आहे.