…तो पर्यंत हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न अवैध – हायकोर्टाचा निर्णय
हिंदू मुलाने मुस्लीम मुलीसोबत केलेलं लग्न अवैध मानलं जाऊ शकते असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने ( Punjab and Haryana high court) दिला आहे. अर्थात, ते दोघे जण सज्ञान असतील तर परस्पर सहमतीनं संबंधामध्ये राहू शकतात असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्याच प्रमाणे हा विवाह वैध करण्यासाठी मुस्लीम मुलीनं हिंदू धर्म स्वीकारणे गरजेचे आहे. एका 25 वर्षाचा हिंदू मुलगा आणि 18 वर्षाची मुस्लीम मुलगी या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे.
मुस्लीम मुलीनं धर्मांतर केलेलं नाही. त्यामुळे हे लग्न हिंदू विवाह अधिनियमच्या अन्वये (Hindu marriage act) अवैध आहे. अर्थात याचिकाकर्ते हे सज्ञान आहेत. त्यामुळे ते परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवू शकतात, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
भिन्न धर्मीय तक्रारदार जोडप्याने 15 जानेवारी रोजी शंकराच्या मंदिरामध्ये हिंदू पद्धतीप्रमाणे लग्न केलं होतं. या दोघांच्या जीवाला त्यांच्या कुटुंबीयांपासून धोका आहे. त्यामुळे त्यांनी अंबाला येथील पोलीसांना सुरक्षा देण्याची विनंती केली होती. पोलीस अधिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे या जोडप्याने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने या निर्णयावरील सुनावणी करताना सांगितलं की, 'मुस्लीम मुलगी आणि हिंदू मुलाचा विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध नाही. हा विवाह वैध ठरण्यासाठी मुलीनं धर्मांतर करुन हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे.