Coronavirus | मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका नाही?
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात यश आलं असलं तरी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तिसऱ्या लाटेची फार चिंता करण्याची गरज नसल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. यावर्षी मुंबई शहरामध्ये १ जूनपर्यंत ८० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन ते बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता कमी आहे.
मुलभूत रिसर्च करणारी देशातील प्रसिद्ध संशोधन संस्था असलेल्या टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात याबाबतची शक्यता वर्तवली आहे. TIFR च्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालेली आहे. जर तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल.
मात्र महाराष्ट्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने या विश्लेषणाशी फारशी सहमती व्यक्त केलेली नाही. सरकारी कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, आजही मुंबईमध्ये ६०० ते ७०० रुग्ण सापडत आहेत. जर आमच्या ८० टक्के लोकसंख्येमध्ये खरोखरच अँटीबॉडी विकसित झालेल्या असतील तर एवढे रुग्ण दिसता कामा नये. यामधून दोन निष्कर्ष निघू शकतात. जी अँटीबॉडी पाहिली गेली ती न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी होती की टोटल अँटीबॉडी होती हे पाहावे लागेल. कारण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ही अधिक महत्त्वाची असते.