पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टिकेनंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली प्रतिक्रिया
प्रमोद लांडे , पुणे, शिरूर
देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.
या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, अमोल कोल्हे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर निशाना साधलाय. कोल्हे म्हणाले, शतकमहोत्सवाकडे वाटचालीच्या मार्गदर्शनाऐवजी केवळ पक्षीय उणीदुणी काढली जातात आणि "तुलना करा" या शाळेतील प्रश्नाची देशाच्या संसदेत आठवण होते तेव्हा युवकांच्या पदरी निराशा पडते !
यासोबतच ते म्हणाले की, संसदेचा वापर हा धोरणांवरील टीकेच्या उत्तरापेक्षा आणि बेरोजगारी, महागाई यावरील उपाययोजनांपेक्षा केवळ पक्षीय टीकेसाठी होऊ लागला तर लोकशाहीच्या दृष्टीने निराशाच पदरी येते! अशा शब्दांत खासदार कोल्हे यांनी पंतप्रधानांवर निशाना साधलाय.