विधानसभेत चेतन तुपेंनी विरोधकांना दिली चक्क पशूंची उपमा
विधानसभेत कायमच सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळतो. विधानसभेत गोंधळ घालण्यासाठी दोनही पक्षांना अगदी क्षुल्लक कारणही पुरते. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या कामकाजात अनेक अडथळे आलेले पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा विरोधीपक्षाने अर्थात भाजपने चांगलाच लावून धरल्याने विधानसभेचं कामकाज 1 दिवसासाठी तहकूब करण्यात आलं होतं. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी नवाब मलिकांना अटक करण्यात यावी ह्या मागणीवरून भाजप नेत्यांनी विधानसभा चांगलीच गाजवलेली पाहायला मिळाली.
दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जेव्हा पुण्यातील हडपसर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे बोलण्यासाठी विधानसभेत उभे राहिल्यानंतर त्यांनी 'अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचं' तुपे ह्यांनी कौतूक केले. छगन भुजबळ यांचे कौतूक होताच विरोधी पक्षातील नेत्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर आमदार चेतन तुपे ह्यांनी, "मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे.. शेतात काम करत असताना शेतात शेळ्या, मेंढ्या, बैल, कुत्री फिरत असतात आणि त्या गोंधळात मला बोलण्याची सवय आहे." असं वक्तव्य केलं.
तर दुसरीकडे तुपे यांनी सदस्यांची तुलना प्राण्यांशी केल्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.