इंधन दरवाढ नियंत्रणात न आल्यास युवासेना याहून अधिक तीव्र आंदोलन करेल
अनिल साबळे | सिल्लोड केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने रविवार रोजी सिल्लोड येथे सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे घेऊन केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
केंद्रातील भाजप सरकारने इंधन दरवाढ केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. ' हेच का अच्छे दिन ' असा सवाल उपस्थित करून युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केंद्रातील सामान्य जनते विरोधातील कारभाराचा जोरदार समाचार घेतला. इंधन दरवाढ करून केंद्रातील भाजप सरकार झोपेचे सोंग घेत आहे असा हल्लाबोल करून भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी शिवसेना – युवासेना रस्त्यावर उतरली असून केंद्राने इंधनाचे दरवाढ नियंत्रणात आणले नाही तर शिवसेना – युवासेना याहून अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी दिला.
शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आले. सेना भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील कार्यालय पासून पुढे भगवान महावीर चौका पर्यंत ही रॅली काढण्यात आली. या ठिकाणी नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांना शिवसेना – युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह , जिपचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे,युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.