माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी रुबैय्या सईदच्या अपहरणात यासिन मलिकचा हात
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद (Rubaiya Saeed) हिचं अपहरण करणाऱ्यांमध्ये फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. रुबैय्या सईदने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात तिच्या साक्षीदरम्यान अपहरणकर्त्याला ओळखलं आहे. रुबैया सईद या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बहिण आहेत. 8 डिसेंबर 1989 रोजी सईद यांचं अपहरण करण्यात आलं होतं. रुबैय्या सईद यांना सोडवण्यासाठी 13 डिसेंबर रोजी पाच दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती.
रुबैय्या सईद यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास सीबीआयने 1990 च्या दशकात हाती घेतला होता. रुबैय्या सईदला या प्रकरणात पहिल्यांदाच न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रुबैय्या सईद तामिळनाडूमध्ये राहतात. सईदला फिर्यादी पक्षाने साक्षीदार म्हणून हजर केले होते. या घटनेच्या 31 वर्षांनंतर न्यायालयानं गेल्यावर्षी जानेवारीमध्ये यासिन मलिक आणि इतर नऊ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, आता या प्रकरणाच्या सुनावणीची पुढील तारीख 23 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.