Yashomati Thakur : निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी अशी माझी मागणी आहे
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण राज्य सरकारने केली आहे, तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी अशी माझी मागणी आहे.
राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा सहा ते बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणा दरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
यासोबतच त्या म्हणाल्या की, एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करत आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे. दरम्यान राज्यातील सुशिक्षित महिलांनाही सरकारने लाडक्या भावाच्या योजनेप्रमाणे सन्मानजनक रक्कम दिली पाहिजे. किंवा राज्यातील महिलांना सरसकट पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारने देऊन महिलांचा सन्मान करावा. राज्यातील महिला भगिनींची जर सरकारला खरोखरच काळजी असेल तर त्यांनी महिलांची दीड हजार रुपयात फसवणूक न करता त्यांना किमान पाच हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावेत. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.