चिखलदरातील जगातील सर्वांत लांब स्कायवॉकचे काम रखडले; खासदार बळवंत वानखडेंनी केली पाहणी

चिखलदरातील जगातील सर्वांत लांब स्कायवॉकचे काम रखडले; खासदार बळवंत वानखडेंनी केली पाहणी

जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे होतो आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे होतो आहे. या स्कायवॉकचे 72 टक्के काम पूर्ण झाले असून नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने आक्षेप घेतल्यावर हे काम जुलै 2021 पासून रखडले आहे. चिखलदरा येथे होऊ घातलेला स्कायवॉक सध्यातरी अधांतरीच आहे. दरम्यान या कामाची पाहणी खासदार बळवंत वानखडे यांनी करत याला गती देण्यासाठी व लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चिखलदरा येथील हरिकेन आणि गोरघाट या दोन महत्त्वाच्या पॉईंट दरम्यान स्कायवॉक राहणार आहे. उंच पहाडावर असणाऱ्या ह्या दोन्ही पॉईंटच्या दरम्यान खोल खाईच्यावर काचेचा हा स्कायवॉक असणार आहे. या स्कायवॉकसाठी हरिकेन आणि गोरघाट या दोन्ही पॉईंटवर 500 मीटर उंच मनोरे उभारण्यात आले आहे. जगात स्वित्झर्लंड आणि चीनमध्ये अशा स्वरूपाचे स्कायवॉक आहेत. स्वित्झर्लंड येथील स्कायवॉकची लांबी 397 मीटर तर चीन मधील स्कायवॉकची लांबी 307 मीटर आहे. चिखलदरा येथील स्कायवॉकची लांबी सर्वाधिक 407 मीटर राहणार असून हा स्कायवॉक जगातील सर्वात लांब स्कायवॉक म्हणून गणला जाणार आहे. या प्रकल्पाला 8 फेब्रुवारी 2019 ला सुरुवात झाली होती आणि हा प्रकल्प 9 फेब्रुवारी 2021 ला पूर्ण होणार होता.

वन अधिनियम 1980 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सिडकोने सादर केलेल्या या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय वन मंत्रालयाने काही अटी आणि शर्तीसह मान्य करीत 19 जानेवारी 2019 ला या प्रकल्पाला परवानगी दिली होती. मात्र ज्या भागातून हा स्कायवॉक जाणार आहे. तो भाग संरक्षित व्याघ्र प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने या प्रकल्पास जुलै 2021 मध्ये परवानगी नाकारली. त्यामुळे गोरघाट आणि हरिकेन पॉईंट या दोन्ही ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्याचे काम बरेचसे रखडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com