अमजद खान | कल्याण : शहाड रेल्वे उड्डाणपूलावर एका टॅकरने दुचाकीस्वार महिलेस धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. कविता प्रशांत म्हात्रे असे या मृत महिलेचे नाव आहे. ती एका पेट्रोल पंपावर कामाला होती. या प्रकरणाचा तपास कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
अपघातात मृत झालेल्या कविता म्हात्रे या म्हारळ परिसरात राहत होत्या. कविता ही कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका परिसरातील एका पेट्रोप पंपावर कामाला होती. आज दुपारी ती म्हारळ येथील घरातून दुचाकीवरुन कामावर जाण्यासाठी निघाली. शहाड पूलाजवळ तिच्या दुचाकीला एका टॅकरने धडक दिली. टॅकरच्या मागच्या चाकीखाली सापडली. तिच्या डोक्यावरुन टॅकरचे मागे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला. यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी टॅकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटना घडताच महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पीआय प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.