नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका करणार – अॅड. संग्राम देसाई
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी त्यांच्या वकिलांनी सुरू केली आहे.
सिंधुदुर्ग न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान मुंबई उच्च न्यायालयात देणार असल्याचे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले. या निकालातील आदेश अद्याप प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सविस्तर निकाल आल्यानंतरच नेमका निकाल का फेटाळला याबाबतची माहिती देता येईल असे त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपिठातील न्यायमूर्ती एस पी हांडे यांनी हा निकाल दिला.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना मोबाईल फोन जप्त करण्यासाठी कस्टडीची गरज असणार आहे, असे प्राथमिक कारण दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी या आदेशाला आव्हान दिले तरीही प्रत्यक्षात या प्रकरणातील सुनावणीसाठी सोमवार किंवा मंगळवार उजाडेल असेही वकिलांनी स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारी याचिका दाखल झाली तरीही फाईल केली तरीही याचिका बोर्डावर यायला दोन दिवस जातील, असेही ते म्हणाले.