समृद्धी महामार्ग कधी चालू होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महत्वाची माहिती
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी ते नागपूर विमानतळावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल भाष्य केले आहे. नागपूर ते शिर्डी हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याची माहिती त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार येईल असे ते यावेळी म्हणाले.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्याचे लोकार्पण दिवाळीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, आता पुढील महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. आता लोकर्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.