राज यांच्या सभेप्रमाणे उद्धव यांच्या सभेला 16 अटी, परंतु 'हा' आहे मोठा बदल
राज्यात सध्या वेगवेगळ्या सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे यांच्या वादळी सभांपाठोपाठ आता शिवसेनेनं देखील सभा घेण्यास सुरुवात केली असून, मुंबईच्या बीकेसी मैदानावरील सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आता औरंगाबादेत सभा घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला 16 अटींसह परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली होती. त्यासाठी पोलिसांनी 16 अटी औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police)दिल्या होत्या. मात्र दोन्ही सभेच्या अटींमध्ये फरक आहे. काय आहे हा फरक माहिती करुन घेऊ या...
उद्धव यांच्या सभेच्या अटीत आसन व्यवस्थेची मर्यादा दिली नाही. परंतु राज ठाकरे यांच्या सभेत कमाल मर्यादा 15 हजार दिली आहे.
उद्धव यांच्या सभेसाठी अट
सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
राज यांच्या सभेची अट
सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15 हजार इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15 हजारा पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
उद्धव यांच्या सभेसाठी अट
कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवु नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
राज यांच्या सभेची अट
सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1959 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.
उद्धव यांच्या सभेत या अटींचा समावेश नाहीच...
1)सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
2) सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
3)सदर कार्यक्रमा दरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.