wardha जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट, 11 हजार कुटुंबांना पुराचा फटका
भुपेश बारंगे| वर्धा : वर्धा जिल्ह्यात (wardha) झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. तर 878 गावात 11 हजार कुटुंबांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 69 हजार 718 हेकटर शेत जमिनीवर विविध पिकाचे नुकसान झाले आहे. अद्यापही पाऊस सुरूच आहे त्यामुळे जिल्ह्यावर ओला दुष्काळाचे सावट कायम आहे.
वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून निघाली आहे. ज्यांनी पेरले ते गेले, ज्यांनी दुसऱ्यांदा पेरले तेही गेले आणि ज्यांनी पेरलेच नाही त्यांची आता पेरण्याची हिम्मतच उरली नाही. कारंजा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, समुद्रपुर, सेलू तालुक्याला अतिवृष्टी चा चांगलाच फटका बसला आहे. तब्बल 878 गावे बाधित झाली आहे. तर 11 हजार 869 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे. वर्धा, हिंगणघाट आणि समुद्रपुर तालुक्यात सर्वाधिक बाधित गावांची संख्या आहे. 260 गावे वर्धा तालुक्यात , 104 गावे सेलू तालुक्यात, 95 गावे हिंगणघाट तालुक्यात, 240 गावे समुद्रपुर तालुक्यात बाधित झाली आहेत.
1590 इतकी बाधित घरांची संख्या आहे. तर शेतातील 38 गोठ्याचे नुकसान झाले आहे. आतापर्यत 9 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेती खरडून निघाली असताना पुढे काय करावे असाच यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात 69 हजार 718 हेक्टर इतक्या क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अजूनही प्रशासनाकडून पंचनामा करणे सुरू आहे. पुढील काळात नुकसानीचा मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरूच असून निम्न वर्धा प्रकल्प आणि बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यशोदा, वर्धा, धाम, बोर, वणा या नद्या दुथळी भरून वाहत आहे. गेल्या 14 तासापासून पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येऊ शकते.