राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट! हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांना दिला इशारा
मुंबई : राज्यात हवामान खात्याने पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. १३ ते १५ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजही वर्तविला आहे. छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रब्बी पिकांवर पुन्हा संकट कायम आहे. अशातच, हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर भारतात हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. जिथे पोषक वातावरण तिथेच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.