Wardha | अमृतमहोत्सवी वर्षाला जगण्यासाठी रोज शेतकऱ्यांचा मरणाशी संघर्ष..!
भूपेश बारंगे | वर्धा : वर्धा (wardha) जिल्ह्याच्या हद्दीलगत दुर्लक्षित असलेल्या ताडगावच्या शेकडो शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी रोज मरणाशी संघर्ष करावा लागतो आहे. अमृतमहोत्सवी वर्षाला शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.गावाच्या उत्तरेस असलेल्या लाल नाल्यावरून वहीवाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी 'बांबूसेतू' उभारला.सध्या दीडशे शेतकरी या पुलावरून जीवघेणा प्रवास करत आहे.स्वातंत्र्य काळापासून हा संघर्षमय प्रवास येथील शेतकरी करीत असलेतरी या समस्येकडे शासन आणि प्रशासनाने पाठ फिरवली आहे. कुठे गेला निधी, कुठे आहे नेते असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. विशेषता ज्या नाल्याच्या नावावरून लाल नाला प्रकल्प तालुक्यात आहे. त्याच प्रकल्पाचा हा नाला उगमस्थान आहे.
ताडगाव हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीवर जंगलात बसलेले आहे. या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली असून गावाच्या उत्तरेस 150 शेतकऱ्याची शेतजमीन असल्याने त्यांना लाल नाल्यातून प्रवास करावा लागतो. या नाल्याच्या पात्रातून नियमित पुराचा प्रवाह राहत असल्याने शेतकऱ्यापुढे वहीवाटीचा प्रश्न उभा ठाकला आहे. पूरपरिस्थितीमुळे पीक हातची गेली. यातून मार्ग काढण्यासाठी ताडगाव शेतकऱ्यांना मार्गाचा अडथळा निर्माण झाल्याने चक्क शेकडो शेतकऱ्यांनी 'बांबूसेतू' उभारून जीवघेणा प्रवास सुरु केला आहे.
2015 या वर्षी तत्कालीन सरपंच यांनी प्रशासनाकडे या नाल्यावर पूल निर्मिती करण्याची मागणी केली होती.मात्र अद्यापही या पुलाची निर्मिती करण्यात आली नसल्याने आम्हाला जीवघेना प्रवास करावा लागतो अशी प्रतिक्रिया सरपंच विनायक श्रीरामे यांनी सांगितली. या नाल्यातून वहीवाट करण्यासाठी शेतकरी सचिन सोनवाने, अनिल श्रीरामे, अरुण मडावी, काशिनाथ मडावी, छत्रूघन मसराम, देविदास चौधरी, अमोल नन्नावरे, अविनाश सोनवणे, नितीश वाघ, प्रभाकर मसराम यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या नाल्यावर 'बांबूसेतू' तयार केला आहे. मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेत या नाल्यावर सिमेंट पुलाची निर्मिती करावी अशी मागणी ताडगाव ग्रामस्थांनी केली आहे.