बांगडापूर शिवारातील पाझर तलाव फुटला; शेतपिकांचे मोठे नुकसान
भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बांगडापूर गावलगतचा शेतीच्या ओलितासाठी फायदेशीर असलेला पाझर तलाव तुडुंब भरलेला होता. मात्र, पाण्याची पातळी वाढत असताना अचानक बांगडापूर येथील पाझर तलावाची भिंत फुटली. तलावातील पाणी वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतातील पीक वाहून गेले. यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तलावाचे पाणी कारंजा बांगडापूर रस्त्यावरून काही काळ वाहत असल्याने कारंजा वर्धा वाहतुक ठप्प झाली होती.
तालुक्यात संततधार पावसामुळे नदी-नाल्याना पूर आल्याने तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पिपरी, लिंगा मांडवी, धावसा, उमरी, बिहाडी, आजनादेवी, ठाणेगाव, सावळी- आगरगाव, गवंडी यासह इतर गावातील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहे. यात बांगडापूर येथील पाझर तलाव आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे या परिसरातील शेतपिकांचे मोठं नुकसान झाले आहे.
या तलावातील पाणी शेतकऱ्याच्या शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात बांगडापूर गावाचा पिण्याचा पाण्याची सुविधा होती. मात्र, तलाव फुटल्याने तलावातील साठवणूक असलेले पाणी पूर्णतः वाहून गेले. यात कोणतेही जीवतिहानी झाली नसली तरी उन्हाळ्यामध्ये आता गावाचा पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्यातील अनेक गावातील पाझर तलावानी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कारंजा माणिकवाडा रस्त्याचा पुन्हा संपर्क तुटला
रात्रभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील अनेक नदी-नाल्यानं पूर आला होता. यात रस्त्यावर असलेला कमी उंचीचा पुलावरून पाणी वाहत असल्याने गवंडी- कारंजा, उमरी -कारंजा, पिपरी कारंजा, कारंजा माणिकवाडा या रस्त्याचा संपर्क काही काळ तुटला होता. सावरडोह नजीकचा खडक नदीवरील पूलावरून वारंवार पुराचे पाणी वाहत अनेकदा या रस्त्याचा संपर्क तुटला जातो. त्यामुळे येथे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. आज या पुलावरून पाणी वाहत असताना बस अडकली होती. सावरडोह येथील पोलीस पाटील शरद ढोले यांच्या सतर्कतेने 5 वर्षापासून येथे कोणतेही अनुचित घटना घडली नाही. पुराच्या पाण्यातून कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. यामुळे त्यांच्या कार्याच कौतुक केले जात आहे.