वर्ध्याच्या तीन वर्षीय आर्याची नव्या विक्रमाला गवसणी
वर्धा जिल्ह्यातील आर्या पंकज टाकोणे या तीन वर्षीय चिमुरडीने एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून नवा विक्रम केला आहे.एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
वर्ध्यातील पूलगाव येथे राहणाऱ्या आर्याने येथील गांधी पुतळा ते सेंट अॅन्थनी स्कूल या दरम्यानचे एक किलोमीटरचे अंतर सहा मिनिट व एका सेकंदात पार केले. इंडिया बुकसाठी हे अंतर धावण्यास आठ मिनिटे तर एशिया बुकतर्फे सात मिनिटांचा वेळ आर्याला दिला होता.
दरम्यान आर्याने हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजे सहा मिनिटे एका सेकंदात पूर्ण करीत विक्रमाची नोंद केली. याबाबतची घोषणा संस्थेचे आयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली.दीड वर्षांपासून आर्याने पूर्वतयारी सुरू केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती.
खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिला विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. दोन वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये आर्या धावली होती. सर्वात लहान धावपटू म्हणून तिने पुरस्कार जिंकला होता. यापूर्वी चीनमधील तीन वर्षीय बालकाने एक किलोमीटरच्या अंतराची शर्यत आठ मिनिटात जिंकल्याची नोंद आहे.