विरार दरोडा, हत्याकांडातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून फरार
संदीप गायकवाड| विरार : विरारमधील बहुचर्चित आयसीआयसीआय बँकेतील दरोडा आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे हा वसई न्यायालयाच्या आवारतील सार्वजनिक शौचालयातून फरार झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
ठाणे न्यायालयातून सुनावाणीसाठी अनिल दुबे या आरोपीला वसई न्यायालयात आणलं होतं. दुपारी तीनच्या सुमारास वसई पंचायत समितीच्या समोरील सार्वजनिक बाथरूममध्ये लघुशंकेसाठी घेऊन गेले असता आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका दिला व बाथरूमच्या बाजूच्या रोडवरील आपल्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून फरार झाला आहे. आरोपीने पूर्व नियोजित कट रचून फरार झाला असल्याचे समोर आले आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात भादंवि कलम 224, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत.
दरम्यान, 30 जुलै 2021 ला रात्री 7 च्या सुमारास आयसीआयसीआय बॅकेचा पूर्व मॅनेजर अनिल दुबे याने विरारच्या आयसीआयसीआय बँकेत दरोडा टाकून तेथील मॅनेजर आणि सहयोगी साथीदार योगिता चौधरी-वर्तक हिची निर्घृणपणे हत्या केली होती. तर यात बँकेतील कर्मचारी श्रध्दा देवरुखकर ही जखमी झाली होती. नागरिकांनी अनिल दुबेला पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं.