राज ठाकरेंकडून अटींचे उल्लंघन? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या औरंगाबाद इथल्या सभेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात येत असून औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या सर्व अटींचं पालन झालं आहे का? तसेच राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेतही यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहे. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंच्या सभेत पोलिसांच्या अटींचं पालन झालं नसल्याबाबत वळसे-पाटील म्हणाले की, या संदर्भात औरंगाबादचे पोलीस कमिशनर आज त्या संदर्भातील व्हिडीओ पाहतील. त्यात अटीशर्तींचं कुठे कुठे उल्लंघन झालं याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेतील. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील. दरम्यान, सर्व समाजाला आवाहन आहे की, त्यांनी समाजात शांतता, सलोखा ठेवण्याचं काम करावं. कुणीही तापवातापवी पेटवापेटवीचं काम करत असेल तर त्यांना साथ देऊ नये, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केलं.
तसेच राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप केले म्हणून त्याचा काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. पवार साहेबांचे राजकीय आणि सामाजिक जीवन देशाला माहिती आहे. पवार साहेबांनी नेहमी विकासाचे आणि समाजाला उभे करण्याचे काम केले आहे. त्यांच्या हातून हजारो महत्त्वाचे निर्णय झाले आहेत आणि त्या निर्णयांच्या माध्यमातून आजची महाराष्ट्राची समृद्धी आहे, असे वळसे-पाटील यांनी म्हटले.
'राज ठाकरे भोंग्यांबाबत अल्टिमेटम देऊ शकत नाहीत'
भोंग्यांबाबत काय करायचे, हा निर्णय राज ठाकरे घेऊ शकत नाहीत. कालच्या सभेत त्यांनी फक्त समाजात द्वेष कसा निर्माण होईल, असाच प्रयत्न केला. औरंगाबाद पोलीस त्यांचे भाषण पूर्णपणे ऐकतील. त्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सोपवतील, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.