Vijay Wadettiwar : मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर; विजय वडेट्टीवार म्हणाले...
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.