वसई-विरार पालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणाचा कळस! 12 तास मृतदेह ठेवला रुग्णांच्या शेजारी
संदीप गायकवाड | वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या सर डी.एम.पेटीट या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 12 तास मृतदेह जनरल वॉर्डमध्ये अन्य पेशंटच्या शेजारी ठेवल्याचा प्रकार घडला आहे. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. यानंतर सर्वच सस्तरांवरून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचे वसई गावात सर डी.एम. पेटीट हे रुग्णालय आहे. या रुग्णालयत 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान एक बेवारस मृतदेह आणण्यात आला होता. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक 04 मध्ये हा मृतदेह ठेवला होता. या रुममध्ये तीन ते चार पेशंट होते. दुसऱ्या दिवशी साडे अकरा वाजेपर्यंत हा मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला असल्याने त्याच्यावर माशा बसल्या होत्या. याच मच्छर, माशांनी रात्रभर त्रास दिला असल्याचे अन्य रुग्णांनी सांगितले आहे.
एका रुग्णांचा मित्र धीरज वर्तक यांनी या मृतदेहाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केला. यानंतर तेथील पालिका कर्मचाऱ्यांनी पळापळ करत मृतदेह इतरत्र हलविला. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणाबाबत पेशंटच्या नातेवईकांनी संताप व्यक्त केला आहे.