पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना काळात शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग भरवण्यात अडचणी येत असल्याने अभ्यासक्रमाबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय जारी केला असून शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल, असं त्यांनी सांगितले आहे.