अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं; गारपिटीमुळं शेतीवर नवं संकट
सचिन बडे | विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मंगळवारी सायंकाळी गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले.अवकाळी पावसानं पुन्हा एकदा विदर्भाला झोडपलं असून नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला.
● भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसारा शिवारात नयन पुंडे हा बारा वर्षीय मुलाचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
● अमरावती : जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
● नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड तालुक्यात गारांसह पाऊस झाला. मोहपा, वाढोना व मेंढला परिसरात गारपीट झाली.
● यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले आहे. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती आणि जवळपासच्या तालुक्यात गारा पडल्या आहेत.
● औरंगाबाद : जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील 10 ते 12 गावांत तर वैजापूर, गंगापूर तालुक्यातही गारांसह मोठा पाऊस झाला.हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी गारपिटीचा अंदाज दिला होता. मंगळवारी दुपारी अचानक वातावरण बदलले आणि दोन जिल्ह्यांत गारपीट व पावसाने झोडपून काढले.
● जालना : जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील दुनगाव, पिठोरी, सिरसगाव परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. तीर्थपुरी गावाच्या परिसरातही अवकाळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारा पडल्या.