95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. ठाले-पाटील म्हणाले की, सध्या अध्यक्षाचे नाव घोषित केले आहे. थोड्यात वेळात अजून एक बैठक घेऊन तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सासणे हे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडतात.