कोणत्याही परिस्थितीत ‘हा’ शुल्क भरणार नाही ; औरंगाबादमधील व्यापाऱ्यांचा पवित्रा
औरंगाबाद जिल्ह्यातील शहरातील व्यापारी आधीच व्यवसायिक कर भरतात. त्यात आता परवाना शुल्काची भर कशासाठी? व्यापारी वर्ग कोणत्याही परिस्थितीत हा शुल्क भरणार नाही अशी भूमिका आता व्यापारी वर्गाने घेतली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जनतेप्रमाणे व्यापारी वर्गाचे प्रश्न देखील त्यांनी सोडवावे या मागणी करण्यासाठी लोकनेत्यांना भेटणार असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.
१ एप्रिलपासून शहरातील व्यापार्यांना व्यवसाय परवाना शुल्क लागू करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी दोन दिवसांत यास अंतिम मंजुरी मिळणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला आहे. व्यापारी वर्गाला आधीच कर लावले जात आहेत. सर्व व्यापारी वर्ग व्यवसायिक कर भरतात. त्यात आता परवाना कर लावणार असेल तर व्यापारी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे परवाना शुल्क भरण्यास जिल्हा व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध दर्शविला जात असून परवाना शुल्क आम्ही भरणारच नाही. अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर परवाना शुल्क न भरण्यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने लोकप्रतिनिधींना करणार आहे. असे महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.