अमरावतीत विनापरवानगी मिरवणूका, मेळावे घेण्यास बंदी
सुरज दहाट, अमरावती | अमरावती शहरात 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारानंतर १३ दिवसांपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पूर्व परवानगीशिवाय मिरवणूका, मेळावे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 व 36 कलम लागू करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जारी केले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सर्व प्रकारचे मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभा यात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास बंदी घालण्यात आली. जर कोणाला असे कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास पोलीस आयुक्त यांच्याकडे तसा लेखी अर्ज करावा.
पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणारे सर्व मेळावे, रंगभूमीविषयक प्रयोग व इतर प्रयोग यांना पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय बंदी घालण्यात आली आहे.