कोरोना काळात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरलेले लाख रुपये केले परत
मयुरेश जाधव | कोरोनासमोर सर्वांनीच गुढके टेकले आहे. तसेच या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. दोन वेळच्या जेवणाची पंचाईत झाली आहे, या सर्व समस्या असताना एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचं दर्शन घडवल आहे. रिक्षाचालकाने प्रवाशाचे १ लाख ९ हजार रुपये परत केले आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर रिक्षाचालकाचं कौतुक केले जात आहे.
उल्हासनगरला राहणारे व्यापारी निरंजन बिजलानी हे शुक्रवारी रात्री कल्याणच्या दूधनाका भागातून उल्हासनगरच्या कॅम्प ३ भागात येण्यासाठी रिक्षात बसले. मात्र उल्हासनगरात उतरल्यानंतर ते त्यांची बॅग रिक्षातच विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी वाहतूक पोलिसांना गाठत त्यांना याबाबतची माहिती दिली.
वाहतूक पोलिसांनी रिक्षाच्या नंबरद्वारे रिक्षाचालकाचा शोध घेत रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांना पोलीस ठाण्यात बोलावलं. यावेळी आपल्या रिक्षात राहिलेली बॅग या संतोष तुपसौंदर्य यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली.
त्यानंतर पोलिसांनी निरंजन बिजलानी यांना पोलिस ठाण्यात बोलावून या बॅगची ओळख पटवली आणि ती निरंजन बिजलानी त्यांच्या स्वाधीन केली. या बॅगमध्ये बिजलानी यांचे तब्बल १ लाख ९ हजार रुपये होते. यावेळी बिजलानी यांनी पोलिसांच्या हस्ते रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांचा सत्कार केला. तसंच रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांचे आभार मानले. या घटनेनंतर उल्हासनगरात या रिक्षाचालकाचं कौतुक केले जातंय.