OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटणार? आज सर्वपक्षीय बैठक
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC political reservation)तिढा अजूनही सुटलेला नाही. अशात मुंबई, पुणे, नाशिक नागपूर सारख्या अठरा महानगरपालिका आणि राज्यातील दीडशे नगरपंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह 27 नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात ओबीसी आणि मराठा नेत्यांचाही समावेश आहे.
सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. सर्व नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीला कोण उपस्थित राहतं हे पाहावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य, ग्राम पंचायती, जिल्हा परिषद येथील ओबीसीचे राजकीय आरक्षण नष्ट झालंय.
याप्रकरणी भाजपने राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर चर्चा होणार आहे.