Uday Samant : केशवराव भोसले नाट्यगृहाची उदय सामंत यांच्याकडून पाहणी; म्हणाले...
कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचे स्टेज जळून खाक झालं. या नाट्यगृहाची पाहणी मंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी उदय सामंत म्हणाले की, कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी जी दुर्घटना घडली आणि जी आपली सांस्कृतिक चळवळीची जी अस्मिता होती केशवराव भोसले नाट्यगृह त्याला आग लागून त्याची परिस्थिती काय झाली हे देखिल मी आज स्वत: पाहणी केलेली आहे.
मला असं वाटतं की, सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे. परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली. जसं हे नाट्यगृह होते तसंच्या तसं बांधण्याचा निर्णय एक वर्षामध्ये घेतलेला आहे. त्याला 20 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचा सहकारी म्हणून नाहीतर एक नाट्य क्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो. लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करु.
तसेच ते पुढे म्हणाले की, ही आग कशामुळे लागली त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिसत आहेत. ही कदाचित नैसर्गिकरित्यादेखील लागलेली आग असेल, आणि कदाचित चौकशीअंती यातून वेगळं देखील काहीतरी निष्पन्न होऊ शकेल. चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलणार आहे आणि वाईट प्रवृत्तीने जर काही केलं असेल तर ते ठेचून काढण्यासाठी तातडीने कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. असे उदय सामंत म्हणाले.