Tuljabhawani Temple: तुळजाभवानीचा चांदीचा मुकूटही गहाळ
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून 63 भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानाच्या वतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सन 2011 पूर्वी चांदीचा मुकूट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मीळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गायब करण्यात आला आहे.
तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकूट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकूट सापडल्याचा दावा केला आहे. पोलीस आता वस्तुस्थिती नक्की काय, याचा तपास करीत आहेत. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. 7 मधील रेशमासह 43 भार वजन असलेल्या चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकूट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मीळ आणि मौल्यवान अलंकारांपैकी 17 अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यांपैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मृत असून, महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. तत्कालीन सहायक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेही आजघडीला हयात नाहीत. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या आढाव्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महंत चिलोजीबुवा हेही उपस्थित होते.