काय सांगता! पुण्यात वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत
अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यात वाहतूक नियमांचे (Traffic Rule) उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) दंड आकारला जाणार नाही. असा निर्णयच पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. आता पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांना केवळ वाहतुकीचे नियमन करावे लागणार आहे. यामुळे पुणेकरांची वाहतूक पोलिसांकडून वसूल केले जाणाऱ्या दंडातून सुटका झाली आहे.
पुणे पोलिसांकडून दंड घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे. वाहतूक पोलीस अडवणूक करतात. पैशांची लूट करतात अशा तक्रारी पुणेकरांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्यास मनाई केली आहे. येथून पुढे वाहतूक पोलिसांना फक्त वाहतुकीचे नियमन करावे लागणार आहे. तर, केवळ सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई होणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हा निर्णय काही दिवसांसाठी आहे. मात्र, तो येथून पुढे देखील कायमस्वरूपी असावा, अशी अपेक्षा पुणेकरांची असेल यात शंका नाही. अर्थात वाहतूक पोलिसांना देखील तशीच अपेक्षा आहे ती म्हणजे वाहतुकीच्या नियमांचा व्यवस्थित पालन पुणेकरांनी करावे.