राज्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अनलॉक दरम्यान व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्या कोरोनाच्या काळात सामान्य माणसांप्रमाणेच व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्याच अनुषंगाने येत्या आठवड्याभरात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं त्यांनी म्हटलंय.
तसेच पालिकेचे आयुक्त यांनी पत्र देखील लिहिले आहे. ज्या व्यक्तींनी लसींचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना विमान प्रवासाला परवानगी द्यावी, असे यामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली. याचसोबत अशा व्यक्तींना बस आणि लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात यावी, असा विचार टास्कफोर्स करत आहे.
व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची वेळ वाढवून हवी आहे. १४ जुलैला या संदर्भात कॅबिनेट मीटिंग झाली. यातून व्यापाऱ्यांसाठी तोडगा काढण्याची आशा होती मात्र, ती फोल ठरली. यामुळे व्यापारी वर्गात नाराजीचा सूर आहे. विशेषत: छोटे खानी दुकानांना याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे लवकरच राज्य सरकार व्यापाऱ्यांसाठी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.