Omicron Patients in Osmanabad; उस्मानाबादमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; एकाच घरात आढळले दोन रुग्ण
उस्मानाबाद : बालाजी सुरवसे | लातूरनंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बावी येथे ओमिक्रॉन कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळून आले आहेत. शारजा येथून तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची बुधवारी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली आहे. चार दिवसांपूर्वी त्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.
बुधवारी या दोघांचाही अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बावी गावातील सीमा सील केल्या आहेत. तसेच गावातून इतर ठिकाणी संसर्ग होऊ नये. याची प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे. मराठवाड्यात लातूर येथील ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ही दोन पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.