Tiranga campaign : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कल्याण-डोंबिवलीत 'हर घर तिरंगा'
अमझद खान|कल्याण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कल्याण डोंबिवली हर घर झेंडा हा उपक्रम राबविला जाणार आहे. महापालिका हद्दीतील प्रत्येक घरावर 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडविण्यासाठी महापालिका झेंडा उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
ही माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक भाऊसाहेब दांगडे केडीएमसी सचिव संजय जाधव हे उपस्थित होते. आयुक्त दांगडे यांनी ही माहिती दिली.
आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, गेल्या 15 ऑगस्टपासून येत्या 15 ऑगस्ट दरम्यान महापालिका हद्दीतील विविध उपक्रम घेऊन स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील 2 लाख 9 हजार घरे आहेत. प्रत्येक घरावर झेंडा फडकला पाहिजे. यासाठी 2 लाख 10 हजार झेंडा मागविण्यात आले आहे. मागविण्यात आलेले झेंडा हे पुरेसे आहेत. कमी पडल्यास आणखीन झेंडा उपलब्ध करुन देण्याची तयारी महापालिकेचे आहे.
एक झेंडा हा 20 रुपये किंमतीचा आहे. त्याचे शुल्क नागरीकांकडून घेतले जाईल. कापडी झेंडा सकाळ ते संध्याकाळ या वेळात 13, 14 आणि 15 ऑगस्ट दरम्यान घरावर फडवायचा आहे. झेंड्याची आचारसंहिता झेंड्यासोबत दिली जाईल. तीन दिवसानंतर हा झेंडा नागरीकांनी जतन करुन ठेवायचा आहे. 26 जानेवारी, 1 मे रोजी हा झेंडा ते त्यांच्या घरावर लावू शकतात. तसेच महापालिका त्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध करुन देईल. त्यांच्या करवी झेंडा फडकविण्याची माहिती दिली. झेंडा नागरीकांसाठी सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानातूनही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या बीएलओची मदत घेतली जाणार आहे.