बारामती येथे ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा
पुणे : बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) संघटनेच्या वतीने 'क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. रविवार ३० जुलै २०२३ रोजी चिराग गार्डन, बारामती येथे दुपारी २.३० ते संध्याकाळी ७.३० या वेळात हा कार्यक्रम होणार आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. तर क्षत्रिय राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज शेखावत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, सुप्रसिद्ध हिंदी हास्यकवी टी.व्ही. कलाकार शंभू शिखर, पराग बेडसे, महेश दास, प्रमोद राणाजी, संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, मुकुंद काकडे, प्रशांत सातव, मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध विधिज्ञ सुधीर पाटसकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
याच कार्यक्रमात रणजीत ताम्हाणे लिखित 'सुर्यवंशी सगर राजपूत मराठा' या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. एक हजार वर्षांपूर्वी राजपूतान्यातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या सगर राजपूत समाजाचा काळाच्या पडद्याआड गेलेला मूळ इतिहास ताम्हाणे यांनी दीर्घ संशोधन करत सबळ पुराव्यांनिशी या पुस्तकातून मांडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील लोकांनी, तसेच इतिहासप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रणजीत ताम्हाणे यांनी केले आहे.