BMC
BMCTeam Lokshahi

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; BMC अलर्टवर

डॉ. इकबाल सिंह चहल यांची आरोग्य यंत्रणेसोबत बैठक
Published on

मुंबई : महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोविड विषाणू (Corona Virus) बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने विवध आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील कोविड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज प्रशासनाची बैठक घेतली.

BMC
पृथ्वीराज चव्हाण- राहुल गांधींची चार वर्षांपासून भेट नाही, कारण...

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल याप्रसंगी म्हणाले की, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच, आता पावसाळादेखील सुरु होणार असून पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.

BMC
दोन दिवसांत दोन फाशी : जुहू बलात्कार प्रकरणातील आरोपीलाही फाशीच

कोविड आणि मान्सून या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा असली तरी त्याचा नियमितपणे आढावा घेणे आणि यंत्रणा सुसज्ज राखणे गरजेचे आहे. दक्षता म्हणून काही बाबी प्राधान्याने करावयाच्या आहेत, असे सांगून डॉ. चहल यांनी निर्देश दिले.

१) मुंबई महानगरात सध्या होत असलेली कोविड चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजार इतकी असून ती प्रतिदिन ३० ते ४० हजार पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल.

२) सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी.

३) वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोणत्याही रुग्णाला कोविड बाधित असल्याचा अहवाल परस्पर देऊ नये. दैनंदिन कोविड बाधितांचे सर्व अहवाल फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठवावेत. या बाबीचे उल्‍लंघन केल्यास संबंधित वैद्यकीय प्रयोगशाळेवर सक्त कारवाई केली जाईल.

४) सर्व भव्य कोविड रुग्णालयांना (जम्बो कोविड सेंटर) सतर्क राहण्याची सूचना करण्यात येत असून रुग्ण दाखल करुन घेता येईल, अशारितीने सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमण्यात यावेत.

५) महानगरपालिकेच्या सर्व नियमित प्रमुख रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्या दाखल करुन घेता येईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशारितीने तयारी करावी. तसेच सर्व खासगी रुग्णालयांनादेखील आपापल्या स्तरावर सर्व तयारी करुन सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले जावेत.

६) कोविड विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल.

BMC
Singer KK यांना परफॉर्म करायचं नव्हतं; समोर आलं कारण...

सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील कार्यपद्धती, कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार आकारावयाचे दर इत्यादींबाबत यापूर्वी निर्गमित केलेले आदेश पुन्हा एकदा प्रसारित करण्याची सुचनाही महानगरपालिका आयुक्तांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांना केली. तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व आरोग्य व्यवस्थेमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळणाऱया व्यक्तिंची कोविड चाचणी करण्याची व्यवस्था बाह्यरुग्ण सेवा विभागांमध्ये करण्यात यावी, अशी सुचनाही आयुक्तांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com