राज्याच पुढील चार दिवस पावसाचे; शेतकरी चिंतेत
मुंबई : मार्च महिन्यात देशभरात उन्हाळा सुरू होतो. बहुतांश भागात उष्णतेमुळे लोकांना त्रास होऊ लागला आहे. अशातच, हवामान विभागने अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला. भारतीय हवामानशास्त्र विभागा (IMD) नुसार, शनिवार ते पुढील मंगळवार 7 मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या गडगडाटी वादळांचाही परिणाम होईल.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सात मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे. अशातच पाऊस जर झाला तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. फळघडाचे नुकसान होऊन फंगसचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
हवानाम विभागानेल उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला होता. मार्च महिन्यात उत्तर भारतातील काही भागात सरासरी तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, मार्च महिन्यात तीव्र उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाटेमुळे लोकांना त्रास होऊ शकतो. साधारणपणे मे-जून महिन्यात उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसून येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी-मार्चमध्येच मे-जूनची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.