Sangali : मच्छी मार्केट आणि मटण मार्केटचा वाद चिघळला; जोरदार हाणामारी
संजय देसाई | सांगली : मिरज येथे मच्छीमार्केट आणि मटण मार्केटमधील वाद चिघळला असून दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.
मिरज मटण मार्केट व मच्छी मार्केटमध्ये मागील 100 वर्षे दुरुस्ती काम झाले नव्हते. मटण दुकानदार व मच्छी दुकानदार यांच्यात वाद असल्याने दोघांनीही न्यायालयात धाव घेतली होती. अशातच अद्यावत मच्छीमार्केट व मटण मार्केट करण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी 67 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे आज सुरेश खाडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी ठेकेदाराने मच्छीमार्केट बाहेरील भिंत पाडण्याचे सुरू केले. मात्र, नंतर मटण व्यापारी विटा घेऊन कामगारांच्या अंगावर धावून जात विरोध केला.
यावरुन मच्छी दुकानदार व मटण दुकानदार यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी दिसेल ते हत्यार घेऊन दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, दोन्ही गटाचे लोक किरकोळ जखमी झाले आहेत.