१३ लोकांचा बळी घेणारा नरभक्षक सिटी-१ वाघ अखेर जेरबंद

१३ लोकांचा बळी घेणारा नरभक्षक सिटी-१ वाघ अखेर जेरबंद

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर व गड़चिरोली या तीन जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सिटी - १ या नरभक्षक वाघाला अखेर बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले.
Published on

व्यंकटेश दुधमवार | गडचिरोली : विदर्भातील भंडारा, चंद्रपूर व गड़चिरोली या तीन जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सिटी - १ या नरभक्षक वाघाला अखेर बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले. जवळपास आठवडाभरापासून वनविभागाच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. आज (गुरुवारी) सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यात सिटी - १ या वाघाची दहशत तीन जिल्ह्यात पसरली होती. त्याने गडचिरोली जिल्ह्यात ६, भंडारा जिल्ह्यात ४ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३ जण अशा एकूण १३ लोकांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यास वन्यजीव विभागाने परवानगी दिली होती. यानंतर सिटी-१ वाघाने देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर दोन दिवसापूर्वी हल्ला करून तिला मारले होते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने वनविभागाची ताडोबा येथून बोलावलेली चमू त्याच्यावर पाळत ठेवून होती.

जवळच वाघासाठी शिकार म्हणून (बेट) दुसरी एक गायही ठेवली होती. अखेर आज सिटी वन त्या सापळ्यात अडकला आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) डागला, अशी माहिती वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी दिली. या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयाला ताळे ठोकण्याचे आंदोलन आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता सिटी वन हा नरभक्षी वाघ जेरबंद झाल्याने आजच्या आयोजित आंदोलन रद्द करण्यात केल्याचे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com