जादुटोण्याच्या संशयातून घडले 'ते' तिहेरी हत्याकांड
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल अशा गुंडापुरी गावाच्या शेतशिवारातील झोपडीत गेल्या ६ डिसेंबरला झालेल्या तिहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले.
जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या १० वर्षीय नातीचा हातोडा आणि चाकूने वार करून झोपेतच खून झाला होता. विशेष म्हणजे ही हत्या मृत दाम्पत्याच्या मुलांसह काही नातेवाईक आणि जादुटोण्याचा संशय घेणाऱ्या काही लोकांनी मिळून अतिशय थंड डोक्याने केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, देवू दसरू कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५) व अर्चना रमेश तलांडे (१०), अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अर्चना ही देवू यांच्या मुलीची मुलगी होती. ती एटापल्ली तालुक्यातील मरकल येथील राहणारी होती. ती सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती. बुधवारी हे तिघेही गावाजवळच्या शेतात रात्रीपासून मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी एका ग्रामस्थाला त्यांची हत्या झाल्याचे दिसले. त्याने तत्काळ गावकऱ्यांसह बुर्गीच्या (कांदोळी) पोलिसांना माहिती दिली. अर्चनाच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत; तर देवू आणि बिच्चे या दोघांना हातोडीने वार करून ठार मारण्यात आले आहे.