“ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी”
ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला आहे. यामध्ये ते म्हणतात की, "१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करु".
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "ठाण्यात स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ करोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे".
ठाण्यात दररोज १०,००० चाचण्या
महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रश़ासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच दररोज सरासरी पाच ते सात हजार होणाऱ्या चाचण्यांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून दहा हजारांच्या पुढे गेली आहे. दीड महिन्यापूर्वी एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आत होते. मात्र आता हे प्रमाण ७ टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून येते.