गौण खनिज माफियांविरुद्ध महिला तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई
गोपाल व्यास | वाशिम : जिल्ह्यात गौण खनिज, वाळू माफियांनी डोके वर काढले आहे. रिसोड तालुक्यात गौण खनिजाचं उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याच्या माहिती महिला तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना मिळाली होती. यानुसार प्रतीक्षा तेजनकर यांनी मुरूम रेती तस्करांवर जवळपास 13 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. नव्याने पदभार स्वीकारलेल्या महिला तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल विभागाच्या मदतीने ही धाडसी कारवाई केली आहे.
अवैधरित्या वाळू उपसा, गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर, पोकलॅंड, मशीन जप्त करण्यात आल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात होणाऱ्या अवजड वाहनांमधून वाळू, मुरूम वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याबाबत नागरिकांनी महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याने नव्याने पदभार स्वीकारलेल्या महिला तहसीलदार यांनी कारवाईचा सपाटा लावत 13 लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे अवैध गौण खनिजची वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.