आदिवासींच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या; विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात यासाठी आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून आंदोलने, निवेदन व पत्रव्यवहार करीत आहेत. तरीही भरती प्रक्रिया होत नसल्याने, 23 ऑगस्ट रोजी आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक पात्र विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.
मिळालेल्या आश्वासनानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालघर जिल्हा परिषदेमधील ही पेसा क्षेत्र शिक्षक भरती प्रक्रिया 21 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र आता चाळीस दिवस उलटून गेले तरीही याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आमची दिशाभूल व फसवणूक झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. अनुसूचित जमाती पेसा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी आदींसह विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक पात्र विद्यार्थ्यांनी 26 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने, आज आंदोलनकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुख्यमंत्री निवास स्थानापर्यंत लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉंग मार्च काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. व त्यांना रोखण्यात आले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर चर्चा सुरू असेपर्यंत लॉंग मार्च स्थगित करण्यात आला असून आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले आहेत. या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चर्चेत योग्य तोडगा न निघाल्यास लॉंग मार्च काढण्याच्या निर्णयावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.