आमदार रोहित पवारांच्या ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचा रथ गडचिरोली जिल्ह्यातून रवाना
व्यंकटेश दुदमवार | राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार रोहित पवार यांच्या 'स्वराज्य ध्वज' यात्रेला प्रारंभ झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावातून ग्रामपूजन करत यात्रेचा रथ रवाना झाला.
नगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर दसऱ्याच्या दिवशी देशातील हा सर्वात उंच भगवा ध्वज फडकाविला जाणार आहे. हा भगवा ध्वज 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. देशातील 74 ऊर्जा स्थानांवर स्वराज्य ध्वज पोचणार आहे. 37 दिवस सलग प्रवास करत विजयादशमीच्या दिवशी सर्वात उंच भगवा ध्वज फडकाविला जाणार आहे. 74 मीटर उंची असलेला हा भगवा ध्वज 96 × 64 फूट आकाराचा तर वजन 90 किलो आहे. 'आमच्या गावात आमचे सरकार' चळवळीचे प्रणेते देवाजी तोफा यांच्या उपस्थितीत हा ध्वज रवाना झाला. या यात्रेला शुभेच्छा देताना देवाजी तोफा यांनी हा ध्वज स्वराज्य-सुशासन आणि सुरक्षेचे प्रतीक असल्याचे सांगत या यात्रेला शुभेच्छा दिल्या. स्वतः आ. रोहित पवार मात्र या आरंभ सोहळ्याला हजर नव्हते.