साधारण पाऊस होऊनही शेतातील विहिरी भरलेल्या; कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा अजब दावा
पुणे : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पावसाअभावी पीक करपून जात आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये दिलासादायक पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा अजब दावा केला आहे.
काय आहे धनंजय मुंडेंचा दावा?
राज्यात यंदा पाऊस कमी असला तरी रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागानं केला आहे. राज्यातील सरासरी 53.97 हेक्टर वर रब्बीचं पीक घेतलं जातं. यंदा त्यात 9 टक्क्यांची वाढ होऊन एकूण 58.76 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. गहू आणि हरभऱ्याचं क्षेत्र सरासरी इतकंच ठेवलं जाणार आहे.
तर, रब्बी ज्वारी तसेच तेलबियांचं क्षेत्र वाढवण्यात येणार आहे. पिक नियोजनाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आणि रब्बीचं वाढीव क्षेत्र यांचं योग्य संतुलन साधणार असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला. हे सगळं सांगत असताना पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी भरलेल्या असल्याचा दावाही धनंजय मुंडेंनी केला आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, तर मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले होते.