अमरावतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी! पोलीस बंदोबस्त वाढवला... वाद पेटण्याची शक्यता
सुरज दाहाट, अमरावती
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील जयस्तंभ जवळील गरीब नवाज चौक येथील मस्जिदीजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री अकरा-साडे अकराच्या सुमारास दगडफेक झाल्यानं परतवाडा शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे
दिवाळी सणाच्या दिवशी जयस्तंभ चौक मार्गावरून दोन युवकांनी वाहनावरून फटाके फोडत असतांना त्याची ठिणगी धार्मिक स्थळाकडे उडाल्याने यावर काहींनी आक्षेप घेत परिसरात मोठा जमाव झाल्यानं दुसऱ्या गटाकडूनही मोठा जमाव होऊन एकमेकांविरोधात घोषणाबाजी व दगडफेक झाल्यानं परतवाड्यात गंभीर तणावाची स्थिती निर्मान झाली होती. मात्र दोन्हीही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थीची भूमिका घेत दोन्ही गटांना शांत केलं . मात्र रात्री अकरा -बारा वाजता दरम्यान उफाळून आलेल्या दिवाळीच्या फटाक्यांमुळे पुन्हा परतवाडा व अचलपुरात दोन धर्मीयांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे . परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले आहेत .
त्यातील एका गुन्ह्यामध्ये तीन जणांना अटक केली असून दहा-बारा जणांचा शोध सुरू आहे . तर, एका गटातील आठ ते दहा तर दुसऱ्या गटातील दहा ते बारा जणांविरुद्ध आरडा ओरडा करून दगडफेक केल्याप्रकरणी परतवाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेज घेऊन नेमका काय प्रकार घडला याबाबत चौकशी सुरू आहे व जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरच अटक करू अशी प्रतिक्रिया परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली आहे.