शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
मुंबईच्या कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबईत उभारण्यात आलेल्या या पहिल्याच शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची नऊ फूट असून 1200 किलो ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला आहे. सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.
या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासंह इतर पक्षाचे प्रमुख नेते व महाविकास आघाडीतील मंत्री उपस्थित होते.
अविस्मरणीय क्षण
शिवसैनिकांप्रमाणेच माझ्यासाठी देखील हा अविस्मरणीय क्षण आहे. शिवसेनाप्रमुख हे सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी ऋणानुबंध होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.