अनंत गितेंचे वक्तव्य प्रत्येक शिवसैनिकांची भावना- सुधीर मुनगंटीवार
अनिल ठाकरे, चंद्रपूर | 'शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच' असे विधान माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. गिते यांच्या या वक्तव्यावर आता विविध प्रतिक्रीया समोर येत आहेत. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते अनंत गिते यांनी व्यक्त केलेली भावना प्रत्येक शिवसैनिकाची असल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना देव-देश- धर्मासाठी कार्य करणारी आणि बाळासाहेबांची शिकवण जोपासणारी आहे. शरद पवारांनी मात्र आपल्या कारकिर्दीत तीनदा खंजीर खुपसले याचा दाखला दिला. शिवसेना कार्यकर्ते आमदार व मंत्री यांची नार्को टेस्ट केल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दूर ठेवण्याचा निष्कर्ष पुढे येईल असे मत भाजप चे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले अनंत गीते ?
शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्याचं दिसत आहे. गिते यांच्या या वक्तव्यावर आता सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. श्रीवर्धनमध्ये सोमवारी ते बोलत होते.