ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!; लोककलावंतांसाठी कोविड दिलासा पॅकेजला मान्यता
कोरोना महामारीमुळे उपासमारीचं संकट ओढावलेल्या शेकडो लोककलावंतांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोककलावंतांसाठी कोविड दिलासा पॅकेजला मान्यता देण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे असंख्य लोककलावंतांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक पार घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोककलावंतांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फायदा शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड, दशावतार, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग टॉकीज, विधी नाट्य यामधील कलाकारांना होणार आहे. त्यामुळे जवळपास दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या या लोककलावंतांना काहीसा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.